विशेष प्रतिनिधी/मुंबई
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचे सूत्र गुरुवारी ठरले असून ठाकरे गट २० जागा, काँग्रेस १८ जागा, तर शरद पवार गट १० जागा लढविण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या २ जागा दिल्या जाऊ शकतात. परंतु वंचित बहुजन आघाडी हा प्रस्ताव मान्य करणार का, हा खरा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाली. राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्षांत जागावाटपाचे सूत्र ठरले असल्याचे सांगण्यात येत असले तरी महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि शिवसेना अजूनही काही जागांवर आग्रही असल्याचे समजते. जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाहीत, असे आधीच सांगण्यात येत आहे.
सेनेच्या २ जागा मित्रपक्षांना?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला अपेक्षेप्रमाणे २२ जागा मिळाल्या, तर शिवसेना ठाकरे गट २ जागा मित्रपक्षाला सोडण्यास तयार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेना ठाकरे गट मित्रपक्ष म्हणजेच १ स्वाभिमानी आणि १ वंचितला जागा सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
८ जागांवर अजूनही तिढा?
एकीकडे मविआचे जागावाटप निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी अजूनही ८ जागांवर एकमत झाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रामटेक, हिंगोली, भिवंडी, जळगाव, शिर्डी, जालना, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई या जागांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. यातील काही जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याचे समजते.