विसंवाद, वाद व समझोता; ‘मविआ’ची पहिली यादी लवकरच जाहीर होणार

जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, असे वारंवार ‘मविआ’तील नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादामुळे जागावाटपाचा तिढा वाढतच गेला. तथापि...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, असे वारंवार ‘मविआ’तील नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादामुळे जागावाटपाचा तिढा वाढतच गेला. तथापि, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील काँग्रेस हायकमांड यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यानंतर विसंवाद, वादावादीनंतर आता ‘मविआ’त समझोता दृष्टीपथात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ‘मविआ’ची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळत आहे.

विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू झाली होती. मात्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी मविआतील जागावाटपाचा तिढा कायम राहिला. मात्र, आता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात फोनवर चर्चा झाली आणि जागावाटपाचा प्रश्न जवळपास सुटला आहे. त्यामुळे ‘मविआ’ची पहिली यादी लवकरच जाहीर होणार, असे ‘मविआ’च्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

अमरावती, गडचिरोली, रामटेकच्या जागांचा तिढा सुटला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घडामोडींना वेग आला असताना जागावाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद उफाळून आला. २८८ पैकी २७० जागांवर ‘मविआ’चे एकमत झाल्याचे सांगण्यात आले, मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघातील ६ मतदारसंघ, अमरावतीतील ६ मतदारसंघ व गडचिरोलीतील ३ अशा एकूण १५ मतदारसंघांत काँग्रेस आणि शिवसेनेत एकमत होत नसल्याने जागावाटपाचा वाद ‘मातोश्री’ आणि काँग्रेस ‘हायकमांड’कडे दिल्ली दरबारी पोहोचला. अखेर सोमवारी ‘मविआ’तील बड्या नेत्यांची फोनवर चर्चा केल्यानंतर या जागांचा वाद सुटल्याचे ‘मविआ’तील एका नेत्याने सांगितले.

काँग्रेसची ९६ जागांवर चर्चा पूर्ण

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागावाटपाची चर्चा सुरू असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in