मुंबई: येत्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यभरातील जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना सूचना देण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले.
भाजपला बहुमतापासून रोखण्यात महाराष्ट्राचं योगदान...
संजय राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना आम्ही रोखलंय. नरेंद्र मोदी किंवा भाजपला बहुमतापासून रोखण्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. ज्या महाविकास आघाडीनं भाजपला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं, त्याच मविआच्या माध्यमातून एकत्रितपणे लढून विधानसभा १८० ते १८५ जागा जिंकू, असा निर्धार आम्ही केलाय."
आज मुंबईतील दादरस्थित शिवसेना भवनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदार, मुंबईतील विभागप्रमुख यांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यावर चर्चा झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. "विधानसभा निवडणूका आम्ही महाविकास आघाडीतून ताकदीनं लढू. पण २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच शिक्षक मतदारसंघातील तयारीचा आढावा आज घेण्यात आला" असंही राऊत म्हणाले.
एखादी विधानसभा आपण लढवू अथवा नाही, पण...
"महाविकास आघाडीतच आम्ही निवडणूका लढू आणि महाराष्ट्रातील सत्ता काबीज करू. पण २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी होण्यासाठी सूचना जिल्हाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. एखादी विधानसभा आपण लढवू अथवा नाही, पण तिथली संघटनात्मक ताकद दिसायला हवी. पावसाळा जरी असला तरी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीकोनातून तसेच विधासभा निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून इनडोअर मीटिंग संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. लवकरच त्याच्या तारखा जाहीर केल्या जातील". असं राऊत म्हणाले.