"माझा मुलगा राजकारणात लहान"; अजित पवारांना आव्हान देणाऱ्या बाळराजेंच्या वडिलांनी मागितली माफी

सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उत्साहात साजरा केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढला.
"माझा मुलगा राजकारणात लहान"; अजित पवारांना आव्हान देणाऱ्या बाळराजेंच्या वडिलांनी मागितली माफी
Published on

राज्याचे राजकारण कधी कोणत्या दिशेने बदलेल, हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. त्याच विधानावरून राजकारण तापलेलं असताना अखेर माजी आमदार राजन पाटील यांनी आज (दि. १९) माफी मागितली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उत्साहात साजरा केलेल्या कार्यक्रमात राजन पाटलांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद वाढला होता.

काय म्हणाले होते बाळराजे पाटील?

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. त्यावेळी बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. "अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा… पण अनगरकरांचा नाही!" अशा वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी त्या विधानाची टीका केली. विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील राजन पाटलांवर टीकास्त्र डागले. त्यानंतर आज राजन पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली.

राजन पाटलांची दिलगिरी

वाद वाढल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राजन पाटील म्हणाले की, “मुलाकडून उत्साहात किंवा भावनेच्या भरात वक्तव्य गेले. त्याचे मी समर्थन करू शकत नाही. मी वैयक्तिकरित्या अजित दादा, शरद पवार आणि पवार परिवाराची मनःपूर्वक माफी मागतो. माझा मुलगा राजकारणात लहान आहे; नकळत त्याच्याकडून चूक झाली.” असे म्हणत पाटलांनी चूक मान्य केली.

राजन पाटील यांनी स्पष्ट केले की, ते पवार कुटुंबापासून दूर गेले असले तरी त्यामागे अजित पवार कारणीभूत नव्हते आणि ते आजही पवारांचे नेतृत्व मान्य करतात. यासोबतच, राजन पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादी नेत्यांना राग येणं स्वाभाविक आहे. पण जसा आपला मुलगा चुकला तर आपण त्याला पदरात घेतो, तसंच अजितदादांनीही माझ्या मुलाची चूक पदरात घ्यावी आणि हा वाद इथेच थांबवावा,” अशी विनंती राजन पाटलांनी केली.

घटनेचे राजकीय महत्त्व

पवार कुटुंबाशी निष्ठा म्हणून ओळख असलेल्या अनगरच्या पाटील कुटुंबातील बाळराजे यांच्या विधानामुळे राजकीय गदारोळ माजला. पहिल्यांदाच होणाऱ्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत तरुणांचा उत्साह गडबडीत बदलल्याचे राजन पाटील यांनी मान्य केले. बाळराजेंनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर राजन पाटलांनी मागितलेली माफी या गोष्टींवरून अजून कोण काय प्रतिक्रिया देतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in