Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल

नागपूरमध्ये दारू नाकारल्याने संतापलेल्या तरुणांनी बारमध्ये घुसून तोडफोड केली आणि व्यवस्थापकावर हल्ला केला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल
X
Published on

नागपूरमध्ये मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. दारू देण्यास नकार दिल्याच्या रागातून काही तरुणांनी बारमध्ये घुसून मॅनेजरवर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिलच्या मध्यरात्री नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरातील एसके बारमध्ये ही घटना घडली. बार बंद करण्याची वेळ झाल्याने कर्मचाऱ्यांनी काही तरुणांना पुन्हा दारू देण्यास नकार दिला. याच कारणावरून संतप्त झालेल्या तरुणांनी गोंधळ घालत थेट मॅनेजरला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.

VIDEO मध्ये दिसतो थरारक हल्ला

व्हायरल व्हिडिओमध्ये बारचा काउंटर आणि कर्मचारी दिसत आहेत. काही क्षणांतच मोठा आवाज येतो आणि कर्मचारी बाहेर काय घडतंय हे पाहण्यासाठी पुढे जातात. त्यानंतर अचानक काही तरुण आत घुसून मॅनेजरवर हल्ला करताना दिसतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी मॅनेजर काउंटरच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते टवाळखोर काउंटरवरील दारूच्या बाटल्या उचलून मॅनेजरच्या दिशेने फेकतात.

१५ ते १८ बाटल्यांची तोडफोड

हल्लेखोरांनी अवघ्या काही क्षणांत सुमारे १५ ते १८ दारूच्या बाटल्या फोडल्याचं सांगितलं जात आहे. काही जण काउंटरवर चढून मॅनेजरला मारहाण करताना दिसतात, तर इतरांनी कर्मचाऱ्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला असून बारमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आरोपी तेथून पसार झाले.

पाहा व्हायरल व्हिडिओ:

या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in