इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

नागपूरमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह इटलीत सुट्टीचा आनंद घेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा इटलीतील सुट्टीच्या शेवटच्या दिवशीच भीषण अपघात घडला.
इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी
Published on

नागपूरमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह इटलीत सुट्टीचा आनंद घेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा इटलीतील सुट्टीच्या शेवटच्या दिवशीच भीषण अपघात घडला. या अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांच्या तिन्ही मुलांना दुखापत झाली असून, मोठी मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना २ ऑक्टोबर रोजी इटलीतील ग्रोसेटो (टस्कनी प्रांतात) येथे घडली. या दुर्दैवी घटनेमुळे नागपूरमधील व्यावसायिक वर्तुळात तसेच हॉटेल उद्योगात शोककळा पसरली आहे.

मृतांचे नाव जावेद अख्तर (वय ५७) आणि नादरा अख्तर असे असून, ते नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात राहतात. त्यांच्यासोबत प्रवास करणारी त्यांची तीन मुले आरजू (वय २२), शिफा (वय १८) आणि जाजेल (वय १५) हे देखील अपघातात जखमी झाली आहेत. मोठी मुलगी आरजूची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, तिच्यावर इटलीतील स्थानिक रुग्णालयात आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सुट्टीच्या शेवटच्या दिवशीच अपघात

अख्तर कुटुंब गेल्या दहा दिवसांपासून इटली आणि फ्रान्सच्या पर्यटन दौऱ्यावर होते. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ते इटलीतील ग्रोसेटो शहरात ९ आसनी टॅक्सीने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, जावेद आणि नादरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी मुलांना रुग्णालयात हलवले.

नातेवाईक इटलीला रवाना

मृतांचे नातेवाईक असलेले निवृत्त पोलिस उपअधीक्षक इक्बाल आझमी यांनी सांगितले की, “२ ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रोसेटो येथे झालेल्या या अपघातात जावेद आणि नादरा यांचा मृत्यू झाला. आरजू गंभीर जखमी असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शिफा आणि जाजेललाही दुखापती झाल्या आहेत. आम्ही शिफाशी व्हिडिओ कॉलवर बोललो. दोन नातेवाईक तत्काळ इटलीला रवाना झाले आहेत.”

नागपूरचा प्रसिद्ध व्यावसायिक

जावेद अख्तर हे नागपूरमधील गुलशन प्लाझा हॉटेलचे मालक होते. हॉटेल व्यवसायात त्यांचे नाव प्रतिष्ठेने घेतले जाते. त्यांच्या निधनाने नागपूरच्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. हॉटेल स्टेटसचे मालक विजय चौरसिया यांनी सांगितले, “अख्तर दाम्पत्य अत्यंत आदरणीय आणि सहृदय होते. त्यांचे जाणे आम्हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे.”

नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितले, की मृतदेह भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, इटलीतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आवश्यक औपचारिकता पूर्ण केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूरमधील अख्तर कुटुंबाच्या घरी भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे असे इटनकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in