आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!

नागपूरच्या शीतला देवी मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोराने देवाची माफी मागितल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!
आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!
Published on

नागपूर : चोरी करण्यापूर्वी देवाची माफी मागणारा चोर तुम्ही कधी पाहिलाय? नागपुरातून समोर आलेल्या एका सीसीटीव्ही व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. कारण, दोन चोर मंदिरात शिरल्यानंतर त्यापैकी एकाने आधी देवासमोर हात जोडले, कान पकडून जणू माफी मागितली... आणि काही क्षणांतच दानपेटी फोडून रोकड लंपास केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात असलेल्या शीतला माता मंदिरात घडली. मंदिराच्या व्यवस्थापकाने २७ जुलैच्या रात्री मंदिराला कुलूप लावले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडण्यासाठी आल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले.

आत जाऊन पाहिल्यानंतर दोन्ही मंदिरांतील दानपेट्यांची कुलपे फोडून त्यामधील रोकड चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि त्यामध्ये धक्कादायक दृश्य कैद झाल्याचे आढळले.

आधी देवाची माफी... मग चोरी!

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी दोन जण मंदिरात प्रवेश करताना दिसतात. त्यापैकी एक चोर थेट देवासमोर जातो. तो हात जोडतो, कान पकडतो आणि जणू चोरी करण्यापूर्वी देवाची माफी मागत असल्यासारखा काही क्षण उभा राहतो. यानंतर दोघेही दानपेट्यांची कुलपे तोडतात, त्यामधील रोकड काढतात आणि घटनास्थळावरून पळ काढतात. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, "चोरी करायचीच होती, तर माफी कशासाठी?" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

मंदिर व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर लकडगंज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

चोरीला गेलेल्या रकमेचा नेमका आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या दोघांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in