नांदेड जिल्ह्यात आभाळ फाटलं; मुखेड परिसरात हाहाकार, सैन्याला पाचारण

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असतानाच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी (दि. १७) मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने प्रचंड हाहाकार माजवला. विक्रमाबादसह मुखेड व मुक्राबाद परिसरात तब्बल २०६ मिमी पावसाची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात आभाळ फाटलं; मुखेड परिसरात हाहाकार, सैन्याला पाचारण
Published on

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असतानाच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी (दि. १७) मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने प्रचंड हाहाकार माजवला. विक्रमाबादसह मुखेड व मुक्राबाद परिसरात तब्बल २०६ मिमी पावसाची नोंद झाली. या आपत्तीत पाच जण बेपत्ता असून सुमारे १५० जनावरे वाहून गेल्याचे वृत्त आहे. तब्बल ८०० गावांना याचा फटका बसला असून १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२२६ लोकांचा जीव वाचवला

मुखेड तालुक्यातील रावणगाव सर्वाधिक बाधित झाले असून, इथून २२६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आणखी चार गावांतून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना शाळा, मंदिरे आणि उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागला.

शेती आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

पूराच्या पाण्याने शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या. हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. धान्यसाठा, जनावरांचे खाद्य आणि घरातील साहित्यही वाहून गेले आहे.

मदत आणि बचावकार्य वेगाने

या आपत्तीनंतर NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती पाहता सैन्यालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे सर्व अधिकार दिले असून निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

स्थानिकांचा आक्रोश

“तातडीने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होईल,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनीही पूरग्रस्त गावांचा आढावा घेतला व प्रशासनाला मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in