नंदुरबार : देवगोई घाटात शालेय बस दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, ३० हून अधिक विद्यार्थी जखमी

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-मोलगी मार्गावरील देवगोई (देवगुई) घाटात रविवारी (दि. ०९) दुपारी शालेय बस खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली.
नंदुरबार : देवगोई घाटात शालेय बस दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, ३० हून अधिक विद्यार्थी जखमी
Published on

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-मोलगी मार्गावरील देवगोई (देवगुई) घाटात रविवारी (दि. ०९) दुपारी शालेय बस खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कसा घडला अपघात?

मेहुणबारे (तालुका चाळीसगाव, जळगाव) येथील अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी दिवाळी सुट्टीनंतर अक्कलकुवा भागातील गावांमधून शाळेत परत येत होते. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दोन बसेस रविवारी अक्कलकुव्यात आल्या होत्या. त्यापैकी एक बस विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकुव्याकडे परतीच्या मार्गावर होती. देवगोई घाटातील अमलीबारी परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये त्या वेळी ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी होते.

अपघातानंतरची परिस्थिती

स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्याचप्रमाणे अक्कलकुवा, धडगाव आणि कुडगाव येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे.

घाटातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा चर्चेत

स्थानिक नागरिकांच्या मते, देवगोई घाटातील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय आणि धोकादायक स्थितीत आहे. घाटातील वाकडे-तिकडे वळण, सुरक्षित रेलिंगचा अभाव आणि सातपुड्यातील पावसामुळे झालेली निसरडी जमीन यामुळे येथे अपघात होत असतात.

logo
marathi.freepressjournal.in