

मुंबई :‘नरहरी झिरवाळ यांचे काही गंभीर व्हिडीओ बाहेर आले असून त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. ते व्हिडीओ खरे असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे झिरवाळ यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका तृतीयपंथीयासोबतचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी समोर आल्याने अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ वादग्रस्त ठरले आहेत. विरोधी पक्षाने या प्रकरणी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी झिरवाळ यांच्या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात मंत्री झिरवळ यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असून व्हायरल झालेला व्हिडीओ हा तीन-चार व्हिडिओ एकत्र जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याची चौकशीही व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यावर, त्यांना आपण तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या व्हिडिओची शहानिशा करून त्याची सत्यता काय आहे ती पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर, त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. व्हिडीओ जर सत्य असतील तर त्यांच्यावर योग्य ते कारवाई होईलच, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खरात प्रकरण : व्हिडीओ टाकणाऱ्यांवर कारवाई
भोंदू खरात प्रकरणात खोलवर चौकशी सुरू असून अनेक नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. येत्या काळात आणखी काही एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. काही पीडित महिला पुढे येत असून काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणूनदेखील पुढे येत आहेत. त्यांचेही ‘एफआयआर’ हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. मात्र, या प्रकरणातील ज्या दुर्दैवी पीडीत महिला आहेत, त्यांचे व्हिडीओ काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते व्हिडीओ आम्ही सोशल मीडिया साईटवरून हटविले आहेत. पण ज्या-ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या सर्व प्रकरणात गोपनीयतेचे संरक्षण महत्वाचे आहे. काही लोक ही गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा फडणवीसांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला.