लग्नाआधीच आनंदावर विरजण; नाशिकमध्ये वधूचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नाशिकमध्ये लग्नाआधीच चक्कर येऊन वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाआधीच आनंदावर विरजण; नाशिकमध्ये वधूचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लग्नाआधीच आनंदावर विरजण; नाशिकमध्ये वधूचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Published on

नाशिक शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये, वधूचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. रविवारी (दि.२८) सकाळी चक्कर येऊन कोसळल्यानंतर उपचारादरम्यान वधूचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपशीखा गिरीश गोडबोले (वय २९) असे मृत वधूचे नाव असून त्या मुंबईतील दादर-माटुंगा परिसरात, रुपारेल कॉलेजजवळ राहत होत्या. दीपशीखा यांचा विवाह गंगापूर गावाजवळील आलिशान रिसॉर्टमध्ये होणार होता. यासाठी वऱ्हाड मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाले होते. रविवारी सकाळी रिसॉर्टमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना सकाळी ९ .३० वाजता दीपशीखा यांना अचानक चक्कर आली आणि त्या कोसळल्या.

उपचारादरम्यान मृत्यू

घटनेनंतर त्यांची आत्या डॉ. स्वाती बापट यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून दीपशीखा यांना श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांनी तपासणीनंतर दीपशीखा यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

लग्नाच्या तयारीदरम्यान दीपशीखा यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे. आदल्या रात्रीचे जागरण आणि लग्नाची धावपळ यामुळे त्रास होत असावा, असा समज करून सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या अचानक चक्कर येऊन पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचे स्वप्न कुटुंबीय पाहत होते, तिलाच अशा प्रकारे अखेरचा निरोप द्यावा लागल्याने नातेवाईक शोकाकुल झाले आहेत. गोडबोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानीही शोककळा पसरली आहे. दीपशीखा यांच्या मित्रपरिवारासह नातलगांना अश्रू अनावर झाले.

logo
marathi.freepressjournal.in