Nashik : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर

नाशिकच्या दिंडोरी येथे विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झालेल्या भीषण अपघातानंतर राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. स्नेहसंमेलनावरून परतताना घडलेल्या या दुर्घटनेत ६ विद्यार्थ्यांचा समावेश असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू
दिंडोरीत विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यूX (@airnews_mumbai)
Published on

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

फडणवीस यांची घोषणा

"नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना आहे," असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच, मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून त्यांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहिती दिली. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भीषण अपघात कसा घडला ?

शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दिंडोरीतील शिवाजीनगर परिसरात हा अपघात घडला. खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्यानंतर इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एर्टिगा कारने घरी परतत होते. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याशेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळले.

या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अंधारामुळे बचावकार्य कठीण

घटनेची माहिती मिळताच दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली...

तीन क्रेनच्या साहाय्याने रात्री सुमारे १२ वाजता कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर कारमधील सर्व ९ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.

मृतांमध्ये सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेश्मा सुनील दरगोडे (३३), राखी सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे (१६), श्रेयस अनिल दरगोडे (११), माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे आणि समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक अंदाज

रात्रीच्या अंधारात कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज चालकाला आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही विहीर राजू राजे यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जाते. या घटनेने दिंडोरीतील इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोकमग्न वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in