आम्हालाही "कोट्यवधी मोजा, गुलाल उधळा"चे आमिष; माजी आमदार संजय चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

गुजरात राज्यातील एका व्यक्तीने आपली भेट घेऊन पाच ते आठ कोटी रुपये द्या, त्या बदल्यात ५० हजार ते दीड लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकवून देतो, अशी हमी देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप
आम्हालाही "कोट्यवधी मोजा, गुलाल उधळा"चे आमिष; माजी आमदार संजय चव्हाण यांचा खळबळजनक आरोप
Published on

नाशिक : विधानसभा निवडणूक काळात बागलाणमधील निवडणूक 'सेट' करून देतो, असे सांगणार्‍या गुजरात राज्यातील एका व्यक्तीने आपली भेट घेऊन पाच ते आठ कोटी रुपये द्या, त्या बदल्यात ५० हजार ते दीड लाख मतांनी उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडणूक जिंकवून देतो, अशी हमी देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार असून दीपिका चव्हाण त्यांच्या पत्नी आहेत.

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, बागलाण विधानसभा निवडणूक काळात भुज (गुजरात) येथील नारायणदास पटेल या आयटी क्षेत्रातील एका तज्ज्ञाने आपल्याशी संपर्क साधून पाच कोटी रुपये द्या आणि आम्ही तुमच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडून आणू, अशी ऑफर दिली होती. याबाबत आपण पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, या प्रकरणात आपली फसवणूक होऊ शकते, असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे आम्ही जनतेत जाऊन प्रामाणिकपणे निवडणूक लढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे चव्हाण म्हणाले.

यानंतर नारायणदास पटेल याने निवडणूक काळात उमेदवार दीपिका चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रचारात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्याने पटेल याने पुन्हा माझ्याशी संपर्क केला. आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र पटेल यांनी, जर आम्हाला तुम्ही पाच कोटी रुपये देत नसाल तर आम्ही प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्याकडे जाऊ आणि त्यांना विजयी करू, असेही सांगितल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

आ. बोरसेंच्या विजयावर प्रश्नचिन्ह..

गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांचे बागलाण विभानसभा मतदार संघात मताधिक्क्य ५० हजारांनी घटले असताना विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्याच दिलीप बोरसेंचे मताधिक्य तब्बल १ लाख २९ हजारांनी कसे वाढले, असा प्रश्नही आता या ‘सेटिंग’ वरून उघडकीस येत असल्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in