नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक बनून दुकानात यायचं, दुकानदाराला बोलण्यात गुंतवायचं आणि संधी मिळताच दागिने घेऊन पसार व्हायचं! नाशिकमध्ये रविवारी (दि. ८) चोरीचा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जात्रा हॉटेल परिसरातील एका सराफाच्या दुकानात दोन व्यक्ती ग्राहक असल्याचं भासवून आल्या. त्यांनी सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यास सांगितलं. त्यानंतर दुकानदाराचं लक्ष विचलित करून तब्बल अडीच तोळे सोन्याच्या अंगठ्या असलेली ट्रे घेऊन पळ काढला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं अन् संधी साधली
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील जात्रा हॉटेल परिसरात ही घटना घडली. दोन संशयित सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आले होते. त्यांनी दुकानदाराकडे अंगठ्या पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदार त्यांना अंगठ्या दाखवत असताना दोघांनी त्याच्याशी बोलणं सुरू ठेवलं.
याच दरम्यान दुकानदाराचं लक्ष दुसरीकडे वळवून त्यांनी सोन्याच्या अंगठ्या असलेला ट्रे उचलला आणि दुकानाबाहेर धाव घेतली. या ट्रेमध्ये सुमारे अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या.
दुकानाबाहेर गाडी तयार; चोरटे पसार
चोरी केल्यानंतर दोघांनीही दुकानाबाहेर आधीपासून तयार ठेवलेल्या चारचाकी गाडीतून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघेही गाडीतून पसार झाले होते.
चोरीची हातचलाखी CCTV मध्ये कैद
दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही संशयित ग्राहक बनून दुकानात आल्याचं दिसत आहे. ते दुकानदाराशी बोलत असल्याचं आणि त्यानंतर संधी साधून अंगठ्यांची ट्रे घेऊन पळ काढत असल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
या घटनेनंतर परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्राहक असल्याचं भासवून अशा प्रकारे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.