६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन

नेहा डावरे हिचे यावर्षी जूनमध्ये संतोष पवारशी लग्न झाले. मात्र काही दिवसातच तिच्यावर पैशासाठी दबाव टाकणे, मानसिक त्रास देणे, शारीरिक छळ करणे आणि चारित्र्यावर संशय घेणे अशी अत्याचारांची मालिका सुरू झाली. या वातावरणात तिचे दैनंदिन आयुष्य असह्य बनले होते.
६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन
Published on

महाराष्ट्रात विवाहितेच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. गौरी गर्जे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली. केवळ सहा महिन्यांच्या वैवाहिक जीवनातच पैशाची मागणी, मानसिक-शारीरिक छळ आणि कौमार्य चाचणीसारख्या अमानवी कृत्यांचा सामना करत २७ वर्षीय नेहा बापू डावरे हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. पंचवटी परिसरात बुधवारी (दि. २६) ही घटना उघडकीस आली, तर गुरुवारी तिच्या पतीसह सासरच्या चार जणांना अटक करण्यात आली.

लग्नानंतर लगेचच सुरू झाला छळ

नेहा डावरे हिचे यावर्षी जूनमध्ये संतोष पवारशी लग्न झाले. मात्र काही दिवसातच तिच्यावर पैशासाठी दबाव टाकणे, मानसिक त्रास देणे, शारीरिक छळ करणे आणि चारित्र्यावर संशय घेणे अशी अत्याचारांची मालिका सुरू झाली. या वातावरणात तिचे दैनंदिन आयुष्य असह्य बनले होते. आत्महत्या करण्यापूर्वी नेहाने सात पानी सुसाईड नोट लिहिली. सासरचे लोक ती नष्ट करतील या भीतीने तिने त्या चिठ्ठीचे फोटो काढून व्हॉट्सॲपवर आपल्या भावाला पाठवले. या चिठ्ठीत सहा महिन्यांच्या संसारातील प्रत्येक अत्याचाराचा तिने खुलासा केला आहे.

सुसाईड नोटमधील धक्कादायक मुद्दे

हुंड्याच्या मागणी

नेहाने लिहिले की, ६ जून २०२५ रोजी झालेल्या तिच्या लग्नात माहेरच्यांनी १५ लाख रुपये खर्च केले आणि २ हजार लोकांमध्ये लग्न लावले. हुंडा प्रथा बंद असूनही सासरकडून सोन्याची मागणी झाली आणि ती पूर्ण करावी लागली.

नवऱ्याच्या विवाहपूर्व प्रेमसंबंधांचा त्रास

सुसाईड नोटनुसार, लग्नापूर्वी तिच्या नवऱ्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.
त्याने त्या मुलीसोबतचे अश्लील फोटोही नेहाला दाखवले आणि मानसिक त्रास दिला. नेहाच्या म्हणण्यानुसार, “सासरच्या लोकांनी माझी फसवणूक केली.” सासरचे लोक नेहाला वारंवार माहेरून पैसे आणायला सांगत. त्यांच्या दबावामुळे नेहाने २० हजार रुपये आणि भावाची गाडी पतीला दिल्याचा उल्लेखही चिठ्ठीत केला आहे.

चरित्रावर संशय, कौमार्य चाचणी

नेहाच्या चिठ्ठीत सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे कौमार्य चाचणी. पाळी आली असल्याचे सांगितल्यावर सासू संशय घेत होती. त्यामुळे नणंदेने तिची कौमार्य चाचणी केल्याचा धक्कादायक उल्लेख तिने केला आहे. पती सतत तिच्या चारित्र्यावर शंका घेत असे. “तुझा कोणी ठेवलेला यार असेल” असे तो तिला नियमित टोमणे मारत असे.

नेहाने लिहिले आहे की नवरा रात्री झोपू देत नसे. शिवीगाळ सतत चालत असे. दोन वेळा मारहाणही केली. आजारी असताना देखील काम करून घ्यायचे तर नणंदा खोटे सांगून वाद निर्माण करत असे. या सर्वामुळे तिचे आयुष्य दररोज अधिकच असह्य बनत होते.

मन हेलावून टाकणारी शेवटची ओळ

चिठ्ठीच्या शेवटी तिने आई-वडिलांसाठी लिहिलेले शब्द काळीज पिळवटून टाकतात. “तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं… पण माझं नशीब खराब होतं म्हणून नवरा आणि सासर चांगले भेटले नाहीत. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन स्वत:ला संपवते आहे.”

या चिठ्ठीत नेहाने आपल्या सहा महिन्यांच्या संसारातील प्रत्येक अत्याचाराचा तपशीलवार उल्लेख केला आहे. सध्या पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

नेहाच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलिस ठाण्यासमोर जमून संताप व्यक्त केला. जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, पीडितेला न्याय मिळावा, अशी त्यांनी जोरदार मागणी केली.

पोलिसांची तातडीची कारवाई

तक्रारीनुसार पोलिसांनी नेहाचा पती संतोष पवार, सासू जिजाबाई पवार, नणंद शीतल अशोक अहिरे, मीनाक्षी शीतल अहिरे आणि भारती दत्ताराम पवार यांना अटक केली आहे. छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा महिन्यांत उद्ध्वस्त झालेल्या या संसाराने समाजातील महिलांवरील छळ, संशयाची साखळी आणि अमानवी प्रथांची भयावहता पुन्हा अधोरेखित केली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in