नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ अपघात; कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून २ प्रवाशांचा मृत्यू

नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ अपघात; कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून २ प्रवाशांचा मृत्यू

नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनसहून रक्सौलकडे (बिहार) जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस या धावत्या गाडीतून तीन प्रवासी खाली पडले. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Published on

नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनसहून रक्सौलकडे (बिहार) जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस या धावत्या गाडीतून तीन प्रवासी खाली पडले. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ९ वाजता घडली. ही रेल्वे गाडी नाशिक रोड स्थानकावर थांबत नसल्याने, प्रवासी प्रवासादरम्यान पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत आणि जखमी तिघेही बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे.

ढिकलेनगर परिसरात रेल्वे रुळांवर काही व्यक्ती पडल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. तात्काळ ही माहिती नाशिक रोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर दोन व्यक्ती मृत अवस्थेत आणि एक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. मृत दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक तपासानुसार मृतांचे वय सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की, “अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला आहे. जखमी व्यक्ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही, त्याचा जबाब मिळाल्यावर घटनेचा संपूर्ण खुलासा होईल.”

लोको पायलट एस. के. देटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन नाशिक ओढा मार्गावर असताना काही व्यक्ती रेल्वेसमोर आल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी तत्काळ ही माहिती ओढा रेल्वे स्थानकातील अधिकारी आकाश भारद्वाज यांना कळवली. तथापि, तपास यंत्रणेला वाटतं की हे तिघे प्रवासी धावत्या गाडीतून पडले असावेत.

दिवाळी आणि गर्दीचा परिणाम

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. तसेच, बिहार विधानसभा निवडणुका आणि छटपूजेसाठी बिहारकडे जाणाऱ्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक बिहारकडे रवाना होत आहेत. अपघातात सापडलेले प्रवासी या पार्श्वभूमीवर बिहारला निघाले होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in