

नाशिक : टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला सोमवारी नाशिकरोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीदरम्यान पोलिसांनी निदा खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी फारसा प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले.
निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नसल्याचे समजते. तर पाच दिवसांच्या पोलीस कोठडीच्या काळात निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. आता निदा खानला पोलीस कोठडीतून मुक्तता मिळून तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, निदा खान हिच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, आजची सुनावणी देखील 'इन कॅमेरा' पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती गरोदर असल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाईल अशी चर्चा होती, मात्र तिला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेचे मूळ नाव बदलून 'हानिया' असे नामकरण करण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल १७१ लिंक्स पाठवण्यात आल्या, जेणेकरून तिचे पूर्णपणे मतपरिवर्तन करता येईल. पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणे, ठराविक पोशाख परिधान करायला लावणे आणि धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार निदा हिने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे.
निदाचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत
निदाचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तिने मोबाईलमधून डिलिट केलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा रिकव्हर करण्यात येणार असून, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तसेच कॉल डिटेल्स, वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती, फरार काळातील लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाचा तपशीलही एसआयटी कडून तपासला जात आहे.
लवकरच दोषारोपपत्र होणार दाखल
न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे निदा खानची रवानगी आता तुरुंगात होणार आहे. या १४ दिवसांच्या काळात तिचे वकील जामिनासाठी रीतसर अर्ज करू शकतात. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायालय जामीन मंजूर करणार की फेटाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
पीडितेच्या घरात स्वतःच्या धर्माचे विधी
टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मपरिवर्तन प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेनंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने तिने पीडितेचे मतपरिवर्तन करण्यासोबतच तिच्या घरात जाऊन स्वतःच्या धर्माचे विधी पार पडल्याचे आणि पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.