Navi Mumbai : शिवरायांचा 'तो' पुतळा पुन्हा कपड्याने झाकला; अमित ठाकरेंनी केले होते अनावरण

मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा खराब कपड्याने झाकण्यात आला आहे. या प्रकरणाविषयी पत्रकार परिषद घेत अमित ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
Amit Thackeray
Amit Thackeray (Photo-X/@amitrthackeray)
Published on

नवी मुंबईतील नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी सोमवारी (दि. १७) मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आल्याने मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कपड्याने झाकले आहे.

घाणेरड्या कपड्याने झाकले - अमित ठाकरेंचा आरोप

या प्रकरणी अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. अमित ठाकरे म्हणाले की, "माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे…याचा मला अभिमान आहे. काल माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले. पण महाराजांच्या पुतळ्यासह सभोवतालच्या मंडपाला आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आलं आहे. एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. कारण महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. महाराजांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही." असा इशारा अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

"छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत.त्यांच्या सन्मानासाठी जे काही सहन करावं लागेल, ते सगळं आम्ही आनंदाने सहन करू." असेही अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं?

नवी मुंबई येथे अमित ठाकरे हे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल समजले. गेले चार महिने या पुतळ्याचे अनावरण झाले नव्हते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुतळा खराब कपड्याने झाकून ठेवला होता. त्यामुळे त्यांनी परवानगीची वाट न बघता पुतळ्याचे अनावरण केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणावर मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "या प्रकरणासंदर्भातील माहिती मंत्रालय देईल. असं असलं तरीही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर उदघाटन तातडीने झालंच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे".

logo
marathi.freepressjournal.in