Navle Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात; कंटेनरची ४ ते ५ गाड्यांना धडक

पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (दि. १७) दुपारी पुन्हा एकदा या पुलावर अपघाताची घटना घडली. ४ ते ५ वाहनांना कंटेनरने धडक दिली.
Navle Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात; कंटेनरची ४ ते ५ गाड्यांना धडक
Published on

पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (दि. १७) दुपारी पुन्हा एकदा या पुलावर अपघाताची घटना घडली. ४ ते ५ वाहनांना कंटेनरने धडक दिली.

या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. अपघाताचे नेमके कारण वाहनातील बिघाड की रस्त्यावरील उताराचा परिणाम याबाबत पोलिस तपास करत आहेत.

नुकताच घडला होता भीषण अपघात

पाच दिवसांपूर्वीच नवले पुलावर भीषण अपघात घडला होता. भरधाव ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने वाहनांना दिलेल्या जबर धडकेत एका कारला आग लागली आणि ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना अद्याप ताजी असतानाच अल्पावधीतच पुन्हा एकदा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

नवले पुलावरील पाच वर्षांचे धक्कादायक चित्र

वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, नवले पूल परिसर गेल्या पाच वर्षांत अपघातप्रवण ठरला आहे. पाच वर्षांत एकूण २५७ अपघातांची नोंद झाली असून यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे घडले आहेत. यामध्ये ११५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ९४ जण जखमी झाले आहेत.

या आकडेवारीवरून नवले पूल परिसर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही बाजूंचा उतार, वेगाने धावणारी वाहने, जड वाहनांवरील नियंत्रण सुटणे आणि रस्त्याची रचना या समस्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. दर काही दिवसांनी होणाऱ्या अपघातांमुळे या परिसरातील स्थानिक नागरिक आणि वाहनचालक सतत भीतीच्या छायेखाली प्रवास करत असल्याचे दिसते. अलीकडच्या जीवघेण्या अपघातानंतर तातडीने पावले उचलण्याची मागणी आणखी तीव्र झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in