नणंद-भावजय बारामतीत भिडणार

रासपचे महादेव जानकर यांनी परभणी आणि माढ्याची जागा मागितली होती. त्यांनी माढ्यातून तयारीही सुरू केली होती. मात्र, परभणीत तेवढी तयारी नव्हती. परंतु, या जागेवर त्यांचा आग्रह असल्याने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना ही जागा मिळाली.
नणंद-भावजय बारामतीत भिडणार

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अखेर सुनेत्रा पवार यांनाच बारामतीतून उमेदवारी जाहीर केली. शरद पवार गटानेही सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीत नणंद आणि भावजयीत लढत रंगणार आहे. महायुतीत असलेली खदखद संपताच शनिवारी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीचा उमेदवार जाहीर केला. यासोबतच रासपचे नेते महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केली. याअगोदर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजी आढळराव-पाटील यांची नावे जाहीर केली होती. शनिवारी त्यांनी हॉटसीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीची उमेदवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जाहीर केली. त्यामुळे यावेळी प्रथमच पवार कुटुंबीयांतच लढत होणार आहे. सुप्रिया सुळे या बारामतीच्या तीनवेळा खासदार राहिलेल्या आहेत. मात्र, सुनेत्रा पवार प्रथमच राजकारणात येत आहेत. तथापि, त्यांच्यामागे अजित पवार यांचे पाठबळ आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होणार आहे.

यासोबतच परभणी लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासप नेते महादेव जानकर यांना तेथे उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जानकर यांनी माढ्यातून महायुतीच्या उमेदवाराविरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढून त्यांना महायुतीत आणले आणि राष्ट्रवादीकडून त्यांना परभणीतून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे परभणीत महादेव जानकरांविरुद्ध ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात लढत रंगणार आहे.

रासपला राष्ट्रवादीची साथ मिळणार का?

रासपचे महादेव जानकर यांनी परभणी आणि माढ्याची जागा मागितली होती. त्यांनी माढ्यातून तयारीही सुरू केली होती. मात्र, परभणीत तेवढी तयारी नव्हती. परंतु, या जागेवर त्यांचा आग्रह असल्याने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना ही जागा मिळाली. त्यातच ठाकरे गटाचे संजय जाधव हे तेथे विद्यमान खासदार आहेत. यावेळी प्रथमच या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यात आता राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार राजेश विटेकर आणि एकूणच राष्ट्रवादीची जानकर यांना कितपत साथ मिळते, यावर या मतदारसंघातील गणित अवलंबून आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in