

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)वरिष्ठ नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन अर्थखाते पुन्हा पक्षाला मिळावे अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अर्थखात्याच्या हस्तांतरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखाते राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
बैठकीनंतर भुजबळ यांनी धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि जय पवार यांच्यासह प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला परत देण्यास बराच कालावधी उलटला असून, आता ते लवकरात लवकर राष्ट्रवादीकडे सोपवावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखाते देण्याबाबत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राज्यातील सध्याची परिस्थिती, दुष्काळी प्रश्न आणि निधीची उपलब्धता यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
राज्याच्या आर्थिक गरजांचा विचार करून निर्णय
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधीची व्यवस्था करावी लागणार आहे. कर्जमाफीसंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजना तसेच पाच हजार रुपयांच्या आगाऊ मदत हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे अर्थखाते हस्तांतरित करण्याची वेळ राज्याच्या आर्थिक गरजांचा विचार करून निश्चित केली जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील रिक्त मंत्रिपदाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय महायुतीतील घटक पक्ष सामूहिकपणे घेतील. भाजपमधील रिक्त पदांचाही त्यात विचार केला जाईल. मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शहा यांचीही सकारात्मक भूमिका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागण्या आणि महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत किंवा चार-पाच मंत्र्यांमध्ये बदल करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी या चर्चांचे खंडन केले.
भेटीतील प्रमुख तपशील
राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थखाते पक्षाकडे परत देण्याची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागणीला सकारात्मक प्रतिसाद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद हे निर्णयातील महत्त्वाचे कारण
हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते मिळण्याची राष्ट्रवादीला अपेक्षा
खाते हस्तांतरणाची निश्चित तारीख अद्याप जाहीर नाही
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांचे छगन भुजबळ यांच्याकडून खंडन