राष्ट्रवादी विलीनीकरण अखेर अधांतरीच! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अंधारात ठेवण्यात आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी विलीनीकरण अखेर अधांतरीच! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित
राष्ट्रवादी विलीनीकरण अखेर अधांतरीच! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अंधारात ठेवण्यात आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. पटेल, तटकरेंच्या या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित झाली असून त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण अधांतरी राहण्याचे संकेत मिळत आहेत.

विलीनीकरणाबाबत तटकरेंचे कानावर हात

शरद पवार यांच्या विधानाबद्दल माध्यमाच्या प्रतिनिधींनी तटकरेंना प्रश्न केला असताना त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तसेच विलीनीकरणाच्या प्रश्नावरही त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र, आज समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडीओवर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आजच्या व्हिडीओमध्ये जी बैठक दाखवली आहे ती बारामतीमधील कृषी प्रदर्शनाची आहे. ती चहापानासाठी बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचा स्पष्ट खुलासा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता, असे सांगत तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे विलीनीकरणाची चर्चा खोडून काढली.

एकत्र येण्याची अजितदादांची व आमचीही इच्छा - पाटील

एकत्र येण्याबाबत चर्चा करण्याची जबाबदारी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. मात्र, अपघात झाला आणि यात खंड झाला. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्यावर एकमत झाले होते. हा निर्णय १२ तारखेला जाहीर करायचा होता. ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण अचानक ही घटना झाली. अजितदादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा असल्याचे पवार म्हणाले.

शपथविधीची पवारांना कल्पना न दिल्याने गूढ वाढले

नुकत्याच पार पडलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने युती करून लढवली. शिवाय सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही गटाने एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नजीकच्या काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवार यांना कोणतीही कल्पना न दिल्याने विलीनीकरणाचे गूढ वाढले आहे.

विलीनीकरणाची चर्चा पुढे नेण्याबाबत प्रश्नचिन्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया होती, असा दावा केला जात आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी एकत्र येण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या इच्छेनुसार दोन्ही गटाकडून एकत्र येण्याबाबत भावना व्यक्त होत आहेत. मात्र, विलीनीकरणाची चर्चा पुढे नेण्याआधीच राष्ट्रवादी अजित पवार गटाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली.

घाईमागे तटकरे, पटेल यांचा हात...

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शनिवारी बारामतीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांच्या आजच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. स्वतः सुनेत्रा पवार यांनी कोणतीच चर्चा केली नाही. असा निर्णय घेण्यासाठी इतकी घाई का केली जात आहे अशी विचारणा करतानाच पवार यांनी या निर्णयामागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असावेत, अशी शंका बोलून दाखवली.

logo
marathi.freepressjournal.in