

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांकडून सुनेत्रा पवार यांचेच नाव घेतले जात आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या १५ दिवसांत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांची वेगवेगळी विधाने राजकीय वर्तुळात चर्चेत असतानाच अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावरुनही जोरदार राजकीय चर्चा होत होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार शुक्रवार सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे हजर होत्या. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले व पार्थ पवार आणि जय पवार हेही पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पोहोचले. एकीकडे या भेटीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पुढील १५ दिवसांत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या १५ दिवसात होणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात पुढची चर्चा होईल, अशीही माहिती मिळत आहे.