राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्तेपदाची यादी जाहीर; अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांना वगळले, वादग्रस्त विधान भोवले?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पुन्हा एकदा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पक्षाने प्रवक्त्यांची जुनी यादी रद्द करत नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अलीकडे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्तेपदाची यादी जाहीर; अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांना वगळले, वादग्रस्त विधान भोवले?
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पुन्हा एकदा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पक्षाने प्रवक्त्यांची जुनी यादी रद्द करत नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अलीकडे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. पक्षात काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत असल्याच्या चर्चा होत्या. त्याचा थेट परिणाम या फेरबदलातून दिसून येतो.

ठोंबरे-चाकणकर संघर्ष

फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून रूपाली ठोंबरे यांनी तीव्र टीका केली होती. चाकणकरांनी पोलिसांची बाजू घेतल्याचा आरोप करीत ठोंबरे यांनी त्यांच्यावर चारित्र्यहननाचा आरोप केला होता. या वादानंतर ठोंबरे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस देखील दिली होती. त्यांनी अजित पवार यांना भेटून स्पष्टीकरण दिले असले तरी अखेरीस त्यांना प्रवक्तेपद गमवावे लागले.

अमोल मिटकरींच्याही वक्तव्यांवर नाराजी

अमोल मिटकरी यांनी अलीकडील काळात महायुतीतील काही नेत्यांवर उघडपणे टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपत आहे. त्यापूर्वी पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

काहींना पुन्हा संधी

आश्चर्याची बाब म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मारहाण प्रकरणी वादात सापडलेले सुरज चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रवक्तेपदावर स्थान देण्यात आले आहे. तर, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

नवीन प्रवक्त्यांची यादी

राष्ट्रवादीने ज्या चेहऱ्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे, त्यात विविध पातळीवर सक्रिय नेत्यांचा समावेश आहे. नवीन नियुक्त प्रवक्त्यांची यादी पुढीलप्रमाणे -

  • अनिल पाटील

  • रूपाली चाकणकर

  • चेतन तुपे

  • सना मलिक

  • हेमलता पाटील

  • राजीव साबळे

  • सायली दळवी

  • आनंद परांजपे

  • राजलक्ष्मी भोसले

  • प्रतिभा शिंदे

  • प्रशांत पवार

  • शशिकांत तरंगे

  • ब्रिजमोहन श्रीवास्तव

  • अविनाश आदिक

  • सुरज चव्हाण

  • विकास पासलकर

  • श्याम सनेर

अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे या चेहऱ्यांची नावे वगळली असली तरी त्यांना आगामी निवडणुकीत नवीन संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in