
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा एक नवा अध्याय लिहिणार जाणार आहे. कारण, पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून पास आउट होणार आहे. ३० मे रोजी १४८ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड (पीओपी) पार पडणार असून, यामध्ये १७ महिला कॅडेट्स ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्ससह पदवीधर होणार आहेत.
२०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर UPSC मार्फत २०२२ मध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एनडीएमध्ये प्रवेश खुला करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाच्या तीन वर्षांनंतर आता या महिलांनी आपले कठोर प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.
या पहिल्या महिला तुकडीतील कॅडेट इशिता शर्मा यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, “मी पूर्णतः गैर-लष्करी पार्श्वभूमीतून आले आहे. माझे आईवडील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात, तर भाऊ आयटीमध्ये आहे. एनडीएमध्ये प्रवेशासाठी जाहिरात पाहिली आणि विचार न करता अर्ज केला.” इशिताने एनडीएमधील तीन वर्षे अत्यंत कष्टाने पूर्ण केली असून, ‘डिव्हिजन कॅडेट कॅप्टन’ (DCC) ही पदवी प्राप्त केली आहे.
इशिता म्हणते, “येथील प्रशिक्षणामुळे माझे व्यक्तिमत्त्वच बदलले आहे. नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास यामुळे मी पूर्णतः एक नवी व्यक्ती बनले आहे.”
इशितासोबतच कॅडेट हरसिमरन कौर हिनेही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले, “आता मी भारतीय नौदल अकादमीत सामील होणार आहे. महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीतील सदस्य असल्यामुळे आमच्यावर पुढच्या पिढीच्या कॅडेट्ससाठी बेंचमार्क तयार करण्याची जबाबदारी आहे.”
NDA मध्ये महिला कॅडेट्सची संख्या वाढतेय -
२०२५ च्या मार्च महिन्यात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०२२ पासून आजपर्यंत NDA मध्ये १२६ महिला कॅडेट्सनी प्रवेश घेतला असून त्यापैकी १२१ अजूनही प्रशिक्षण घेत आहेत. पाच कॅडेट्सनी वैयक्तिक कारणांमुळे NDA सोडले आहे.
या महिला कॅडेट्सपैकी सर्वाधिक ३५ हरियाणामधून, २८ उत्तर प्रदेशमधून, १३ राजस्थानमधून आणि ११ महाराष्ट्रातून आहेत. दक्षिण भारतातून कर्नाटकातील एक व केरळमधील चार कॅडेट्स NDAमध्ये सामील झाल्या आहेत.
एनडीएचे प्रशिक्षण अत्यंत कठोर, शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी घेणारे असते. यामध्ये तिन्ही सैन्यदलांसाठी शिस्त, नेतृत्व, बौद्धिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जाते. पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या महिला कॅडेट्सनी खऱ्या अर्थाने इतिहास घडवला आहे.
३० मे २०२५ रोजी एनडीएमध्ये होणारी पासिंग आउट परेड ही केवळ एका बॅचच्या यशाची नव्हे, तर संपूर्ण भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.