
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यातील विशेष मावळ भागातील आणि राजकीय क्षेत्रात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या घरातील सुनांच्या अत्याचारांच्या घटना समोर आल्या आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुनांच्या जाचाला आणि अस्तित्वाला वाचा फोडली आहे. या घटनेत सहआरोपी असलेल्या वैष्णवीच्या दिराची सुशील हगवणेची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी त्याने समाजातील 'सुनां'साठी केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सुशील हगवणेला ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी -
वैष्णवी हगवणेचा मोठा दीर सुशील हगवणे सध्या पोलिस कोठडीत आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे सोबत त्याचा मोठा मुलगा सुशील देखील फरार होता. घटनेच्या आठ दिवसांनी त्या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली. २८ मे रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वैष्णवीची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांकला एक दिवसाची पोलिस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणेला ३१ मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोस्ट सुनेच्या अस्तित्वासाठी -
या प्रकरणादरम्यान सुशील हगवणेची एक जुनी पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने ३ मे २०२४ रोजी इंस्टाग्रामवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे,
"यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणुया....सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सुनेसाठी."
या पोस्टमध्ये सुशीलने स्त्री सक्षमीकरणाचा आविर्भाव घेतला असला तरी, वैष्णवीच्या मृत्यूनंतर उघड झालेल्या सूनेच्या अत्याचारामुळे नेटकरी संतापले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या संपूर्ण घटनेत करिष्मा हगवणे म्हणजेच सुशीलच्या बहिणीचे कटकारस्थान प्रामुख्याने समोर आले. या घटनेमध्ये लेकीच्या सांगण्याने हगवणे कुटुंबात सूनांचा छळ करण्यात आला. त्यामुळे या पोस्ट आणि घटनेची तुलना करून नेटकऱ्यांनी सुशीलच्या ढोंगीपणावर सडकून टीका केली.
या पोस्टवर प्रतीक्षा नामक एका युजरने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना लिहिले :
'यावेळी लेकीला सोबत घेऊन सूनेला मारून टाकूया.. श्रीमंत भिकारी. सूनेचा पैसा घेऊन तिच्या पैशावर जगणारे दुसऱ्यांना अक्कल शिकवतात."
तर दुसऱ्या युजरने लिहिले :
"घरातल्या लक्ष्मीला मारहाण करायची आणि बाहेर ज्ञान सांगायचं.. हुंडा आणि सासरवाडीला पैसे मागता लाजा नाही वाटत का रे? तुमच्यापेक्षा आम्ही सर्वसाधारण लोकं बरेच!"
तर अजून एका युजरने म्हंटले आहे :
''स्वतः च्या घरातील सुनांचा छळ करायचा आणि बाहेरच्या सुनांकडून इतिहास घडवायचा आहे. महाराष्ट्र शासनाने तुमच्या पुर्ण फॅमिलीचा इंन्काउंटर केला पाहिजे.. हिच तुमची शिक्षा आहे.''
या प्रतिक्रिया समाजातील सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिबिंब आहेत. सामाजिक सन्मानाचे ढोंग करणाऱ्या सुशील हगवणेवर घरातील महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
सुशीलच्या पत्नीलाही मारहाण आणि अत्याचार -
केवळ वैष्णवीच नव्हे, तर सुशील हगवणेच्या पत्नीने मयूरी हगवणेने देखील त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर मानसिक व शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. त्याच्या आई-वडीलांसह भाऊ-बहिणींनीही घरातील सुना म्हणजेच वैष्णवी आणि सुशीलची पत्नी यांच्यावर सातत्याने जाच केल्याचे आरोप समोर आले आहेत.
यावरून स्पष्ट होते की घरातील स्त्रियांच्या स्वाभिमानाचा आदर करायचा नसतानाही, सुशीलसारखे पुरुष राजकीय प्रसिद्धीसाठी "स्त्रीसन्मान" हा मुखवटा घालून फिरत आहेत. सध्या पोलीस यंत्रणा वैष्णवीच्या आत्महत्येचा तपास करत आहे. वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून सातत्याने केली जात आहे.