
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत गाढ झोपेत असलेल्या रासने कुटुंबाचा करुण अंत झाला. फर्निचरच्या गोदामात हि आग लागली असून आगीने क्षणातच उग्र रुप धारण करत ५ जणांचा बळी घेतला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय ३६), पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय १०) व अवघ्या ६ वर्षांच्या चैतन्यचा मृत्यू झाला. तर, त्यांची आजी सिंधुताई (वय ८५) यांचा देखील मृत्यू झाला. यश किरण रासने (२५) हा तरुण जीव वाचवण्यात यशस्वी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सर्वांचा गुदमरून आणि भाजून मृत्यू झाला.
मयूर रासने यांचे वडील अरुण रासने यांचे नेवासा फाटा येथे फर्निचरचे मोठे दुकान आणि गोदाम आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावरच त्यांचे घर आहे. परिसरात हलका पाऊस सुरू असतानाही आगीने काही क्षणांतच वरच्या मजल्यावरील राहत्या घराला वेढले. गोदामात साठवलेले लाकडी सामान, भुसा व फोम यामुळे आगीचा भडका उडाला. रासने कुटुंबीय गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अरुण रासने आणि त्यांची पत्नी मालेगाव येथे नातेवाईंकाकडे गेल्याने ते बचावले.
आगीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नेवासा पंचायत समितीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या हृदयद्रावक घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.