"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज (दि.२१) मतमोजणी झाली असून अनेक ठिकाणचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. त्यातच राणे बंधूंमधील सत्तासंघर्षामुळे मालवण नगरपरिषदेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या लढतीत शिवसेना (शिंदे गट)ने दणदणीत विजय मिळवत मालवण नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
Published on

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज (दि.२१) मतमोजणी झाली असून अनेक ठिकाणचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. त्यातच राणे बंधूंमधील सत्तासंघर्षामुळे मालवण नगरपरिषदेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या लढतीत शिवसेना (शिंदे गट)ने दणदणीत विजय मिळवत मालवण नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

मालवणची ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राणे बंधूंमधील सत्तासंघर्षामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. शिवसेना (शिंदे)चे आमदार निलेश राणे आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, तसेच प्रचारादरम्यान घडलेल्या घटनांमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. विशेषतः निलेश राणे यांनी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे निवडणूक अधिकच गाजली होती.

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..."

याच पार्श्वभूमीवर निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. निकाल जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं. या विजयानंतर आमदार निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आज माझ्या एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत,” असं सांगत त्यांनी हा विजय पूर्णपणे जनतेचा असल्याचं नमूद केलं.

निलेश राणे म्हणाले, “या विजयामागे माझी कोणतीही जादू नाही. लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलं, हा त्यांचा कौल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि पक्षातील सर्व नेत्यांच्या पाठबळामुळेच हा विजय शक्य झाला.”

समोर असलेले भाजप उमेदवारही आमचं कुटुंबच

ते पुढे म्हणाले, “आम्ही शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो. समोर असलेले भाजपचे उमेदवारही आमच्याच कुटुंबाचा भाग आहेत. मात्र निवडणूक म्हणजे निवडणूकच असते. कुटुंब एका बाजूला आणि लोकशाहीची लढत दुसऱ्या बाजूला.”

या विजयामुळे आता आमच्यावर अधिक जबाबदारी आली असल्याचंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं. “निवडणुकीत कुणाचा विजय होतो, कुणाचा पराभव. जनतेने आम्हाला संधी दिली आहे, त्यामुळे मालवणच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in