

मालवण तालुक्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २६) एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याच्या घरावर अचानक धाड टाकत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्याचा दावा केला आहे. “भाजप नेते रवींद्र चव्हाण घरी येऊन गेल्यावर काय होतं?” हे पाहण्यासाठीच ही कारवाई केल्याचा उल्लेख राणे यांनी केला. संपूर्ण घडामोड त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित करताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
भाजपची निष्ठा
राणे काही कार्यकर्त्यांसह भाजपचे जुने पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी घरात निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशाचा साठा असल्याचा दावा त्यांनी केला. लाईव्ह व्हिडिओत त्यांनी एक बॅग दाखवत “रवींद्र चव्हाण येऊन गेल्यावर काय होतं?" हे बघा असा आरोप केला. तसेच, ते म्हणाले, "विजय केनवडेकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते. त्यांची भाजपवर निष्ठा आहे. भाजपचीही त्यांच्यावर निष्ठा आहे. ती निष्ठा दिसतेच आहे." राणे पुढे म्हणाले, “निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळा पैसा फिरतोय… ही त्याचीच झलक आहे.”
या आरोपांवर विजय केनवडेकर यांनी घरात सापडलेली रक्कम त्यांच्या व्यवसायाची असल्याचे सांगितले. यावर राणे यांनी ती माहिती निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावी लागेल, असे स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी स्वतःच्या भूमिकेचीही स्पष्टोक्ती देत म्हटले, “मीही महायुतीत आहे, पण भाजप अशी पैसे वाटपाची पद्धत वापरत असेल तर ती योग्य नाही. अशा प्रकारांनी निवडणूक लढवू नये.”
...नाही तर मीच बंदोबस्त करेन
लाईव्हदरम्यान परिसरात मोठी गर्दी जमा झाली आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राणे यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. मालवण पोलिस अल्पावधीतच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराची पाहणी सुरू केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरात आढळलेल्या रकमेचा पंचनामा सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांशी बोलताना निलेश राणे म्हणाले, “निवडणुकीला अजून सहा दिवस आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी २०-२५ लाख मिळत आहेत. हा प्रकार थांबवला नाही तर मीच बंदोबस्त करेन. पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे.”
भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या घटनेबाबत संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने किंवा पक्षाकडून कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, ज्यांचे नाव घेऊन आरोप करण्यात आले, त्या रवींद्र चव्हाण यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
निलेश राणेंच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती राज्य निवडणूक आयोगालाही देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.