
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात तर अनेक गावांमध्ये शेतजमिनी आणि घरांना पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या कठीण परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला खासदार ओमराजे निंबाळकर थेट पुराच्या पाण्यात उतरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ परंडा तालुक्यातील वडनेर गावातील आहे. येथे एका कुटुंबाच्या घरात अचानक पाणी घुसले. या घरातील आजी, नातू आणि इतर दोन व्यक्ती रात्रीच्या अंधारात घराच्या छतावर अडकून पडले होते. ही माहिती मिळताच खासदार निंबाळकर स्वतः बचावकार्य करत घटनास्थळी धावले. त्यांनी NDRF च्या पथकांसोबत पाण्यात उतरून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
पाहा व्हिडिओ
प्राण वाचविल्याचा आनंद
ओमराजेंच्या या धाडसी मदतकार्यातील दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. नागरिकांनी त्यांच्या या पुढाकाराचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनीही सोशल मिडियावर पोस्ट करत नागरिकांचे प्राण वाचविल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे म्हंटले आहे.
बाळासाहेबांचा शिवसैनिक
शिवसेना ठाकरे गटाने सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, ''बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली!! धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली.''