

धाराशिव : 'पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,' अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'चे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि ५ जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत याआधी दिले होते.
'भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,' असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, शनिवारी पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून 'यू टर्न' घेतल्याचे दिसते.