

सूर्यकांत आसबे/सोलापूर :
धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोन दशकांनंतर माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी निर्दोष मुक्तता केली.
'माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही, संशयाचा फायदा घेऊन गुन्हा सिद्ध होत नाही, माफीच्या साक्षीच्या आधारे शिक्षा देता येत नाही. साक्षीदाराने वेळोवेळी जबाब बदलले आहेत, आपल्याला मारले आणि धमकावले, असे माफीचा
साक्षीदार पारसमल जैन वेळोवेळी सांगतोय', असे निरिक्षण नोंदवत मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. नावंदर यांनी मुख्य आरोपी तथा माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माफीचा साक्षीदार पारसमल जैन, मोहन शुक्ला, कैलास यादव, सतीश मंदाडे, शशिकांत कुलकर्णी अशा एकूण ९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.
खटल्याचा पायाच संशयावर आधारित
आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) यांसारखे महत्त्वाचे तांत्रिक पुरावे तपास यंत्रणेला सादर करता आले नाहीत. संपूर्ण खटल्याचा पाया अत्यंत कमकुवत आणि संशयावर आधारित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांच्या साक्षीलाही न्यायालयाने अपेक्षित महत्त्व दिले नाही. आरोपींनीच हा गुन्हा केला आहे, हे शंकातीतपणे सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय होते मूळ प्रकरण?
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी हे मुंबईहून धाराशिवकडे जात असताना ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुमारे १४ वर्षे सुरू होती. १२८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या होत्या.
न्याय मिळाला नाही-ओमराजे निंबाळकर
निकालानंतर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, आम्हाला न्याय मिळालेला नसल्याची भावना व्यक्त केली. 'आमचे कुटुंब गेली २० वर्षे न्यायासाठी संघर्ष करत आहे. विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत,' असे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयात अपील करणार- सीबीआय
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्येतून झालेल्या सुटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, अशी माहिती येथील सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
'सीबीआय'ने या प्रकरणातील आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले असल्याने, सीबीआय आता विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देईल' असे सीबीआय प्रवक्त्याने सांगितले.
न्यायालयाचे 'सीबीआय'वर ताशेरे
पवनराजे हत्याकांडाचा निकाल देताना न्यायालयाने सीबीआयच्या तपासातील अनेक त्रुटींवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. या खटल्याचा मुख्य आधार असलेला माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने वेगवेगळ्या टप्यांवर तीन वेळा आपले जबाब बदलल्याचे न्यायालयाने नमूद केले. अशा परिस्थितीत त्याचा जबाब - विश्वासार्ह मानणे शक्य नाही. तसेच आरोपींविरोधात ठोस आणि शंकातीत पुरावे - सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली.