'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. नावंदर यांनी माफीचा साक्षीदार पारसमल जैन याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार
'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार
Published on

मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. नावंदर यांनी माफीचा साक्षीदार पारसमल जैन याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी शनिवारी (दि.२०) निर्दोष सुटका केली.

'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार
२० वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष सुटका

निकाल धक्कादायक

निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, "गेली २० वर्षे आमचे कुटुंब न्यायासाठी संघर्ष करत आहे. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, आजचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आणि अनपेक्षित आहे."

'मग पवनराजेंना कोणी मारलं?'

विशेष न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ओमराजे निंबाळकर यांनी, "जर सर्व आरोपी निर्दोष असतील, तर मग माझ्या वडिलांची हत्या नेमकी कोणी केली?" असा सवाल उपस्थित केला.

तपासाबाबत न्यायालयाने कोणतीही साशंकता व्यक्त केली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. "मागील २० वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायालयीन लढाई लढत आहे. आता सर्व आरोपी निर्दोष ठरत असतील, तर पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली, याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.

'पवनराजेंना कोणी मारलं?'; कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - निकाल धक्कादायक, उच्च न्यायालयात जाणार
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

राजकीय वैमनस्य मान्य, तरी आरोपी निर्दोष

"न्यायालयाने राजकीय वैमनस्य असल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याचवेळी सर्व आरोपी निर्दोष ठरवण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत," असेही ओमराजे निंबाळकर यांनी नमूद केले.

उच्च न्यायालयात जाणार

विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. "आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत," असे ते म्हणाले.

२० वर्षांच्या लढ्यानंतरही न्यायाची प्रतीक्षा

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण गेली दोन दशके राज्यातील सर्वाधिक चर्चेतील राजकीय प्रकरणांपैकी एक राहिले आहे. या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र, विशेष न्यायालयाच्या निकालानंतर हा न्यायालयीन लढा आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष न्यायालयाच्या निकालानंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, आता या प्रकरणाची लढाई उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. त्यामुळे पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in