

मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आता उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत ‘अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनें’तर्गत १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पात्र शेतकऱ्यांना रिक्षाची चावी देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालत कल्याणकारी मंडळामार्फत 'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना' राबविण्यात येईल. या योजनेचा लाभ ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.
लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड
योजनेसाठी मंडळामार्फत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जांची कागदपत्रांच्या आधारे छाननी करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांकडे कर्जमंजुरीसाठी पाठविण्यात येतील. बँकेकडून वाहनांच्या एकुण किंमतीच्या ९० टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळाकडून १० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. वाहन खरेदीची रक्कम थेट अधिकृत वाहन विक्रेत्याला अदा करण्यात येईल.
पहिल्या वर्षी २० हजार शेतकऱ्यांना लाभ
या योजनेत शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३१० किंवा भविष्यात वाढणाऱ्या तालुक्यांमधील एकूण २० हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध केल्या जातील. पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित उद्दिष्टापेक्षा कमी असल्यास उर्वरित रिक्षांचे वाटप त्याच जिल्ह्यातील अन्यत्र केल्या जातील.
योजनेच्या प्रमुख अटी
या योजनेसाठी लाभार्थी हा दुष्काळग्रस्त क्षेत्रातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्य असणे आवश्यक आहे. संबंधित शेतकरी कुटुंबाच्या नावावर शेती असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.