मुंबई : विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात महायुतीचे आणि त्यानंतर २०२९ मध्ये फक्त भाजपचे सरकार सत्तेवर येईल. ते सरकार एकट्या कमळाचे असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे ‘आता आपले काय होणार? म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे टेन्शन वाढले आहे.
राज्यात सद्यस्थितीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ट्रिपल इंजिन महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे २०२९ मध्ये फक्त भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेवर येणार असेल, तर शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचे काय होणार? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचा दावाही अमित शहा यांनी केला.
अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. गेल्या महिन्याभरातील त्यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अमित शहा म्हणाले, “मी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात, हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील ६० वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला सलग तीन वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही.”
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचेही अमित शहा यांनी सांगितले. “जे सरकार काम करते, तेच जिंकते. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार आले. त्यामुळे आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. राज्यात भाजपचे सरकार येईल, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. पण त्यासाठी जोमात काम करा. यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण २०२९ मध्ये एकट्या भाजपचे सरकार येईल. ते सरकार शुद्ध रूपाने कमळाचे असेल,” असे अमित शहा म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या? एखाद्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला ८५ टक्के गुण मिळाले, पण नेहमी २० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ३० टक्के गुण मिळाले, तर तो विद्यार्थी गावभर मिठाई वाटतो. राहुल गांधी असा मूर्खपणा करत आहेत. विजयी होणाराच सरकार स्थापन करतो. त्यामुळे निराशेला गाडून कामाला लागा. महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार येईल, असा मी शब्द देतो, अशा शब्दांत अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
अमित शहा पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्या दोन जागा निवडून आल्या असतानाही आपला एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नव्हता. हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे. ८०च्या दशकातील सर्वच कार्यकर्त्यांना आपला पराभव होणार हे माहिती होते. पण त्याची त्यांना कोणतीही तमा नव्हती. आपण राजकारणात पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही पदासाठी नव्हे तर महान भारताच्या रचनेसाठी आलोत, अशी त्यांची भावना होती. सरकार येते आणि जाते. आपले सरकार १० वर्षे चालले, पण आपण आपला विचार केव्हाच सोडला नाही.
महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष
निवडणुकीच्या निमित्ताने मी देशभर फिरत आहे. सगळीकडे झारखंड किंवा हरयाणात काय होणार? असे कुणीही विचारत नाहीत. केवळ महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न विचारतात, असे अमित शहा म्हणाले. तोच धागा पकडून आता महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला. त्यावर कार्यकर्त्यांनीही महायुती जिंकणार, असे उत्तर दिले.
‘ते’ आले की उद्योग राज्याबाहेर जातात - राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे राज्यात आले की, राज्यातील उद्योग बाहेर जातात, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. राऊत म्हणाले की, “अमित शहा यांनी मणिपूर, काश्मीरला जावे, कारण सध्या काश्मीरमध्ये निवडणुका सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नेहमीच दहशतवादी हल्ले होतात. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला जाऊन सुरक्षेचा आढावा घ्यावा. मणिपूर गेल्या अनेक दिवसांपासून जळत आहे. तिकडेही जाऊन अमित शहा यांनी आढावा घ्यावा. मात्र, ते सोडून गृहमंत्री अमित शहा हे निवडणुकीसाठी महाराष्ट्रात येतात. ते दोघे महाराष्ट्रात आले की, राज्यातील उद्योग बाहेर जातात.”
राज्यात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही - अजित पवार
“सगळ्यांनाच आपापला पक्ष वाढवायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचे सरकार येऊच शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकते. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर चाळीस वर्षांत राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आले नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमित शहांनी हे वक्तव्य केले असेल. त्यांना त्यांचा पक्ष ‘सिंगल लार्जेस्ट पक्ष’ करण्याचा अधिकार आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली.