चक्क 'टॉवेल - बनियन'वर विरोधक पोहोचले विधानभवनात; संजय गायकवाड यांच्या विरोधात अनोखे आंदोलन

चर्चगेट येथील आकाशवाणी आमदार वसाहतीतील कँटिनमधील कर्मचाऱ्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती समोर येताच विरोधी पक्षाने बुधवारी (१६ जुलै) विधानसभेच्या पायऱ्यांवर एक अनोखे आंदोलन केले.
चक्क 'टॉवेल - बनियन'वर विरोधक पोहोचले विधानभवनात; संजय गायकवाड यांच्या विरोधात अनोखे आंदोलन
Published on

चर्चगेट येथील आकाशवाणी आमदार वसाहतीतील कँटिनमधील कर्मचाऱ्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती समोर येताच विरोधी पक्षाने बुधवारी (१६ जुलै) विधानसभेच्या पायऱ्यांवर एक अनोखे आंदोलन केले.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर विरोधकांनी अंगात बनियन व कंबरेला टॉवेल गुंडाळून या घटनेचा निषेध केला. 'या गुंडाराज सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय' अशी जोरदार घोषणाबाजीही केली.

काय आहे प्रकरण?

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार वसाहतीतील कँटीनमध्ये मिळालेले जेवण खराब असल्याच्या कारणाने कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ही घटना उघडकीस येताच विरोधकांनी गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, गायकवाड यांनी आपली भूमिका कायम ठेवत, "मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही. मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली," असे विधान केले.

विरोधकांचा आरोप

संजय गायकवाड यांनी थेट आमदार वसाहतीत गुन्हा केला आहे आणि त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही हे सरकार अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in