

पालघरच्या आदिवासी बहुल माला पडवीपाडा परिसरात ११ वर्षांच्या मुलांनी दाखवलेले असामान्य धैर्य चर्चेचा विषय ठरले आहे. शाळेतून परतत असताना अचानक समोर आलेल्या बिबट्याशी या मुलांनी दगडफेक, आरडाओरडा आणि हुशारीने वापरलेल्या शाळेच्या बॅगेच्या जोरावर झुंज दिली. त्यांच्या या प्रतिकारामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र यामध्ये एकाच्या हाताला दुखापत झाली आहे.
हल्ल्याचा थरार
पाचवीत शिकणारा मयंक कुवरा आणि त्याचा मित्र शुक्रवारी (दि. २१) सांयकाळी शाळेतून घरी परतत होता. यावेळी अचानक झाडीतून एक बिबट्या बाहेर पडला आणि मयंकवर झेपावला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता मयंकने शाळेची बॅग पुढे धरून स्वतःचा बचाव केला. बिबट्याच्या नखांचे घाव बॅगेवर आणि त्याच्या हाताला लागले. परंतु, बॅग समोर असल्याने बिबट्याला त्याच्यावर थेट हल्ला करता आला नाही.
तत्परतेने बाजूला असलेल्या त्याच्या मित्राने दगड उचलून बिबट्याला मारायला सुरुवात केली आणि आरडाओरडा करून गावकऱ्यांना जमवले. मुलांच्या या प्रतिकारामुळे आणि आवाजाने लोक धावत आले. लोकांच्या भीतीने बिबट्या परत जंगलात पसार झाला.
इजा झाली पण जीव वाचला
या प्रसंगात मयंकच्या हाताला बिबट्याची नखे लागल्याने त्याला खोल जखम झाली आहे. त्याला तातडीने विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, की जखमेवर टाके घातले आहेत. आता मुलाची प्रकृती स्थिर आहे.
वन विभाग सतर्क; धोका कमी करण्यासाठी उपाययोजना
घटनेची माहिती मिळताच कंचाडचे वन अधिकारी स्वप्नील मोहिते पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्ल्याच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि ही घटना गांभीर्याने घेत असल्याचे सांगितले. वन विभागाने या परिसरातील शाळांना सावधगिरी म्हणून दुपारी ४ वाजेपर्यंत शाळा बंद करण्याची सूचना केली आहे. तसेच, बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले. तर, गावकऱ्यांना सतर्क ठेवण्यासाठी परंपरागत दवंडी (ढोल-घंटांच्या सहाय्याने घोषणा) केली जात आहे.
मुलाच्या धैर्याचे कौतुक
एवढ्या लहान मुलांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मयंक आणि त्याच्या मित्राने प्रसंगवधान दाखवले नसते तर परिस्थिती भयंकर ठरली असती आणि अनर्थ झाला असता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे.