
पंढरपुरात दररोज हजारो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येतात. चंद्रभागा नदीत स्नान करून मग विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांसाठी शनिवारचा दिवस दुर्दैवी ठरला. चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर, तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे. नदीत वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघी नदीच्या प्रवाहात बुडाल्या.
पंढरपूरच्या पुंडलिक मंदिराजवळ शनिवारी (१९ जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. उजनी धरणातून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने चंद्रभागा सध्या दुथडी भरून वाहत आहे. याच पाण्याच्या प्रवाहात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या दोन महिला आणि एक अनोळखी महिला बुडाल्या.
या महिला बुडत असल्याचे पाहताच नदी किनारी असलेल्या इतर महिलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. कोळी बांधवांनी तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढले. तिसरी महिला अद्याप बेपत्ता असून, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस पथक तिचा शोध घेत आहे.
या घटनेमुळे पंढरपूरच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हजारो भाविक दररोज चंद्रभागेच्या तीरावर स्नान करून विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतात. मात्र, पाण्याचा वेग आणि पातळीचा अंदाज न आल्याने ही गंभीर दुर्घटना घडली.