

भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी (दि. २२) आत्महत्या केली. लग्नाला अवघे १० महिने झाले असतानाच गौरी गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा गौरीच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर अनंत गर्जेला अटक करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (दि.२५) पंकजा मुंडे यांनी बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
दोन कानाखाली लावल्या असत्या
अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए असल्याने पंकजा मुंडे यांच्यावर सोशल मिडियावर आरोप केले जात होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी गौरीच्या कुटुंबियांची घेतलेली भेट चर्चेत आहे. यावेळी सांत्वन करताना पंकजा मुंडे गौरीच्या वडिलांना म्हणाल्या, "मला गौरीच्या त्रासाबद्दल काही माहिती नव्हती. नाहीतर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या.
मी कोणाला फोन लावला नाही
"भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते की, मी या प्रकरणात कोणालाही फोन केला नाही. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याकडे दहा पीए आहेत. पगारी नोकरांच्या घरात काय चाललं आहे, हे कसं कळणार? मला याबद्दल नंतर समजलं. आधी समजलं असतं तर मी त्याच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. मला समजलं तेव्हा मी खालीच बसले." असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
माझा मुलगा असा वागला असता तर...
पुढे त्या म्हणाल्या, "माझ्याकडे गणपतीला आले होते दोघे नटून-थटून. इतका सुंदर जोडा. मला काहीच माहिती नाही. माझा मुलगा असा वागला असता तर मी त्यालाही पाठीशी घातलं नसतं. या प्रकरणात मी पोलिसांना फोन केला नाही. ते पुढील तपास करतील." असे मुंडेंनी भेटीदरम्यान म्हटले.
जरा धीर धरा...
"तुम्हाला माहिती असूनही तुम्ही काही करू शकले नाही, आम्हाला तर माहितीच नव्हतं. एकमेकांना वैयक्तिक जीवनातील प्रश्न कोण विचारतं? जरा धीर धरा. आपल्या लेकीसोबत असं व्हावं, असं मला कसं वाटेल?" असं म्हणत पंकजा मुंडे यांनी गौरीच्या वडिलांना धीर दिला.