

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे शनिवारी (दि.२०) दुपारी घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. बांधकाम सुरू असलेल्या हनुमान मंदिराचे छत अचानक कोसळल्याने ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर किमान १७ जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी भाविकांची गर्दी
हनुमान मंदिरात शनिवारी नेहमीप्रमाणे भाविकांची मोठी गर्दी होती. याचवेळी मंदिराच्या बांधकामाधीन भागातील छताचा काही भाग कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला.
बचावकार्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव आणि मदतकार्यासाठी पाच जड यंत्रसामग्री तसेच सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
"दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले," अशी माहिती मानवतचे तहसीलदार पांडुरंग मोचेवाड यांनी दिली.
जड दगड भाविकांवर कोसळले
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधून आणलेल्या गुलाबी दगडांचा वापर करण्यात आला होता. हे जड दगड आधारासाठी उभारलेल्या बांबूच्या संरचनेवर ठेवण्यात आले होते. अचानक आधार कोसळल्याने हे दगड थेट भाविकांवर पडले.
स्थानिकांच्या आग्रहामुळे मंदिराचे बांधकाम सुरू असतानाही ते भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील परभणी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे, ही प्रार्थना."
मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
"या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य वेगाने राबवत आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.