पवार विरुद्ध पवार; पुण्यातील लढतीकडे देशाचे लक्ष

पवार विरुद्ध पवार; पुण्यातील लढतीकडे देशाचे लक्ष

पुणे जिल्हय़ात तिसऱ्या टप्प्यांतर्गत बारामती लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान होत आहे.

पुणे /प्रतिनिधी : पुणे जिल्हय़ात तिसऱ्या टप्प्यांतर्गत बारामती लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान होत आहे. मतदानाच्या दृष्टीने मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, पवार विरुद्ध पवार या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून बारामतीत किती टक्के मतदान होणार, याबाबत औत्सुक्य आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात कांटे की टक्कर आहे. मात्र, खरा सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच होत आहे. बारामतीत मतदान किती होणार, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्यामुळे मतांचा टक्का किती राहणार, याबाबत औत्सुक्य असेल.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात ३८० मतदान केंद्रे, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोरमध्ये एकूण ५६१, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्रे आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७ , इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदारसंघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कडक उन्हाळा आहे. राज्याच्या अनेक भागांतील तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. पुण्यातील तापमानाचा पाराही वर गेल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना बाहेर काढणे, हे आव्हान असेल.

काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

बारामतीत पवार काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी चांगलाच जोर लावला आहे, तर पवारांनीही बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकरिता पवार कुटुंबीयांनी ताकद लावली आहे.

लेकीसाठी बारामतीत मतदान

ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामती तालुक्यातील माळेगाव येथे मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी शरद पवार हे मुंबईत मतदान करत होते. मात्र, यावेळी सुप्रिया सुळेंसाठी ते माळेगावमध्ये मतदान करणार आहेत. तसेच आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी थांबणार आहेत.

शरद पवारांचे सर्व दौरे रद्द

मागच्या काही दिवसांपासून प्रचाराचा धडाका लावलेल्या शरद पवार यांचा घसा बसला आहे. त्याचबरोबरच त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पवार यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.

इन कॅमेरा मतदानाची मागणी

बारामती, खडकवासला, दौंड, इंदापूर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत. तसेच गैरप्रकाराचा धोका लक्षात घेऊन येथे इन कॅमेरा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in