पेण तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

याप्रकरणी मेलवर तक्रार प्राप्त झाली असून, प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवण्याकरिता तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत
पेण तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

पेण : पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यावर माती भराव प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री पोर्टलवर दाद मागितली आहे. कथीत भ्रष्टाचार प्रकरणी तहसीलदारांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी पेण तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा पेण येथील तक्रारदार मयुर देवस्थळे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री पोर्टलवर केलेल्या अर्जामध्ये तक्रारदार मयुर देवस्थळे यांनी पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यावर माती भराव प्रकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत तहसीलदारांनी शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवल्याची तक्रार केली आहे. पेण येथील कीर्ती कुमार बाफना यांनी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ३१५९ ब्रास भराव केला. या विनापरवाना भरावाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ रोजी पेण तलाठी यांनी जागेवर जाऊन पंचनामा करून तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्याकडे ३१५९ ब्रास अनधिकृत मातीच्या भरावाचा पंचनामा व अहवाल सादर केला होता. परंतु कीर्तीकुमार बाफना व पेण तहसीलदार यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देवस्थळे यांनी केला. तसेच या आर्थिक हितसंबंधांमुळे तहसीलदार डोईफोडे यांनी आपल्या पदाचा दबाव आणून पेण तलाठी यांना दुसरा नवीन कमी भरावाचा अहवाल व पंचनामा करण्यास भाग पाडले. त्यानुसार तलाठी यांनी दुसऱ्या पंचनाम्यात भराव १०६० दाखविला आहे. त्यामुळे अनधिकृत भरावामध्ये २०९९ ब्रास कमी दाखवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे, असा आरोप तक्रारदार मयुर देवस्थळे यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याची पुष्टी करताना त्यांनी पुराव्यासाठी दोन अहवाल व पंचनामे सुद्धा जोडले आहेत.

याप्रकरणी मेलवर तक्रार प्राप्त झाली असून, प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवण्याकरिता तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच तक्रारदाराला आत्महत्येपासून परावृत्त करण्याकरिता तहसीलदार व डीवायएसपी यांना सूचित केले आहे.

-प्रवीण पवार, प्रांताधिकारी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in