फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणावरून राजकीय वाद पेटले आहेत. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन पाटील यांच्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत. या आरोपांची चर्चा असतानाच रविवारी (दि. २६) फलटणमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत त्यांना उघडपणे पाठिंबा दिला.
मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी...
मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी “फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष करणारे आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी” असा उल्लेख केला. तसेच डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “आमच्या एका लहान बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली आणि त्याचं कारण हातावर लिहून ठेवलं. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली असून सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या लहान बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
मात्र या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत स्पष्ट केलं, “काही लोक प्रत्येक घटनेत राजकारण घुसवायचा निंदनीय प्रयत्न करत आहेत. काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांची नावं ओढण्याचा प्रयत्न झाला. पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे. मला थोडीशी शंका असती, तर मी या कार्यक्रमाला आलो नसतो."
तिथे तडजोड नाही
फडणवीस म्हणाले, “अशा संवेदनशील प्रकरणात मी पक्ष, व्यक्ती, जात किंवा राजकारण पाहत नाही. पण जिथे आमच्या लहान बहिणीचा विषय आहे, तिथे तडजोड नाही आणि जर कुणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रयत्न करत असेल, राजकीय फायदा मिळवायचा प्रयत्न करत असेल, तर ते मी सहन करणार नाही.”
आमचा पूर्ण पाठिंबा
सभेच्या शेवटी फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना थेट पाठिंबा दर्शवत म्हटलं,
“रणजितसिंह, चिंता करू नका. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत.”
नेमका आरोप काय?
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी वरिष्ठ आणि खासदारांच्या खासगी सचिवांकडून दबाव आल्याचा उल्लेख केला होता. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादी आमदार सचिन पाटील यांच्यावर थेट आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील या सभेत फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना दिलेला पाठिंबा आणि विरोधकांवर केलेली टीका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे.