

सातारा जिल्ह्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत बनकर याला सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुण्यातून त्याला शनिवारी (दि. २५) सकाळी अटक केली होती.
मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बनकरचं नाव स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्याच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आधारे त्याला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुढील तपासासाठी ४ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरार आहे. मृत डॉक्टरवर त्याने अनेकदा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असल्याचे समजते.
मृत्यूपूर्वी शेवटचा कॉल
फलटण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी बनकर हा डॉक्टर राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा असून, मृत्यूपूर्वी डॉक्टरने त्याच्याशी फोनवर संपर्क साधल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असून, आरोपींवर कडक कारवाई आणि मृत डॉक्टरला न्याय मिळावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून तसेच नागरिकांकडून जोर धरत आहे.