

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोषींना कठोरात कठोर शिक्षा
फडणवीस म्हणाले, “ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. एक तरुण डॉक्टर स्वतःच्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते, ही बाब मन हेलावून टाकणारी आहे. सरकारने तत्काळ कारवाई केली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. आरोपींवर अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. कोणालाही वाचवले जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, “या संवेदनशील प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, हे अत्यंत चुकीचं आहे. एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहे आणि अशा घटनेवरही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणे ही असंवेदनशीलता आहे. अशा वेळी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे.”
दरम्यान, या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आत्महत्येमागील संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
मुख्य आरोपी अजूनही फरार
या प्रकरणी सातारा पोलिसांनी आरोपी सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत बनकर याला अटक केली असून सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरार आहे. मृत डॉक्टरवर त्याने अनेकदा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असल्याचे समजते.