

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी एक प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी पुण्यातून पहाटे अटक केली आहे. दुसरा मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बडणे मात्र अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
हॉटेलमध्ये आत्महत्येची धक्कादायक घटना
शुक्रवारी (दि. २५) फलटण येथील नामांकित हॉटेलमध्ये बंद खोलीत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही लिखित चिठ्ठी सापडली नसली तरी तिने स्वतःच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. त्यात तिने "माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून ज्याने चार वेळा माझावर बलात्कार केला तसेच बदने याचा साथीदार प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला" असा गंभीर आरोप केल्याने राज्यभर खळबळ उडाली.
आरोपी बनकर पुण्यातून अटकेत
या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. सातारा पोलिसांनी त्यांचा माग काढण्यासाठी दोन विशेष पथके तयार केली. सापळा रचून पोलिसांनी प्रशांत बनकर याला पुण्यातून पहाटे ताब्यात घेतले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बडणे अद्याप फरार आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू केली आहे.