
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे. बीडमधील वाल्मिक कराड प्रकरण ताजे असतानाच, पुण्यात अशा प्रकारे माजी नगरसेवकाकडून मारहाण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जातात. तर या प्रकरणी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत चांदेरे यांना इशारा दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय रौंदल असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून चांदेरे आणि त्यांच्या माणसांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रौंदल याला उचलून आपटल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बाबुराव चांदेरे यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आप'चे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्स पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
कुंभार यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, धक्कादायक! माजी पीएमसी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते बाबुराव चांदेरे यांनी त्यांच्या गुंडांसह तीर्थ डेव्हलपर्सचे विजय रौंदल यांच्यावर क्रूर हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर अखेर एफआयआर दाखल करण्यात आला.
अजित पवार यांचा चांदेरेंना इशारा
या घटनेनंतर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत बाबूराव चांदेरे यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याचा तीव्र निषेध होत आहे.
तसेच काही जणांनी पुणे सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.