पिंपरी-चिंचवड : खेळता खेळता चुकून लिफ्टमध्ये गेला अन् अडकला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये दसऱ्याच्या शुभ दिनी धक्कादायक घटना घडली. चौवीसवाडी येथे गुरुवारी (दि. २) संध्याकाळी एका ११ वर्षाच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. राम स्मृती गृहनिर्माण सोसायटीतील लिफ्टमध्ये ही घटना घडली.
(Photo - FPJ)
(Photo - FPJ)
Published on

पिंपरी-चिंचवडमध्ये दसऱ्याच्या शुभ दिनी धक्कादायक घटना घडली. चौवीसवाडी येथे गुरुवारी (दि. २) संध्याकाळी एका ११ वर्षाच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. राम स्मृती गृहनिर्माण सोसायटीतील लिफ्टमध्ये ही घटना घडली. खेळता खेळता हा मुलगा लिफ्टमध्ये गेला आणि अचानक लिफ्ट बंद पडली. तीन तासाहून अधिक वेळ तो लिफ्टमध्ये अडकला होता. मदत उशिरा मिळाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.

तिसऱ्या-चौथ्या मजल्याच्या मध्येच अडकले पाय

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मुलाचे नाव अमेय साहेबराव फडतरे आहे. अमेय दुपारी साधारणपणे ३ च्या सुमारास खेळत असताना इमारतीतील लिफ्टमध्ये गेला. मात्र, लिफ्ट अचानक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान अडकली. यामध्ये तो आतमध्येच फसला. सुरुवातीला कोणालाही ही घटना लक्षात आली नाही. तीन तासांहून अधिक काळ तो मदतीसाठी ओरडत होता. त्याचे पाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्येच अडकले होते. काही वेळाने रहिवाशांना आवाज ऐकू आला, त्यानंतर त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले.

सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लिफ्ट खाली आणून मुलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला लगेचच जवळच्या केके रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अमेयला मृत घोषित केले.

३ वाजता अडकला पण...

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना संध्याकाळी ५.०५ वाजता घटनेची माहिती देण्यात आली. परंतु, सोसायटीतील रहिवाशांच्या मते, मुलगा दुपारी ३ वाजल्यापासून लिफ्टमध्ये अडकला होता, परंतु कोणालाही त्याचा पत्ता लागला नाही. प्राथमिक तपासानुसार त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

रहिवाशांनी लिफ्टच्या नियमित देखभालीतील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले. पोलिस तसेच संबंधित विभागांकडून लिफ्ट देखभालीबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे.

दसऱ्यासारख्या शुभ दिवशी घडलेल्या या घटनेमुळे चौवीसवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर लिफ्ट सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in