जुन्नरच्या रमेश खरमाळे यांची निसर्ग क्रांती; डोंगराचं पालटलं रूप; 'मन की बात'मध्ये PM मोदींकडून कौतुक

आजच्या धकाधकीच्या युगात निसर्गाचा ऱ्हास, पाण्याचे संकट आणि वाढती जंगलतोड ही अतिशय चिंतेची बाब ठरत आहे. पैशाच्या मागे धावताना माणूस निसर्गाच्या मागे धावणे विसरत चालला आहे. परंतु, अशा काळातही काही व्यक्ती निस्वार्थपणे निसर्गाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे रहिवासी रमेश खरमाळे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत.
Ramesh Kharmale
Ramesh Kharmale
Published on

आजच्या धकाधकीच्या युगात निसर्गाचा ऱ्हास, पाण्याचे संकट आणि वाढती जंगलतोड ही अतिशय चिंतेची बाब ठरत आहे. पैशाच्या मागे धावताना माणूस निसर्गाच्या मागे धावणे विसरत चालला आहे. परंतु, अशा काळातही काही व्यक्ती निस्वार्थपणे निसर्गाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे रहिवासी रमेश खरमाळे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत. एकेकाळी भारतीय सैन्यात शौर्याने सेवा करणारे रमेश खरमाळे आज वनरक्षक म्हणून पर्यावरण रक्षणासाठी आपल्या कुटुंबासह अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली, हे त्यांच्या कार्याच्या व्यापकतेचे प्रतीक आहे.

‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून गौरव -

१२३व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश खरमाळे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. ते म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा आठवड्याच्या अखेरीस लोक आराम करणे पसंत करतात, तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंब कुदळ-फावडे घेऊन डोंगरांवर जातात. ते जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खोदतात, बिया लावतात. फक्त दोन महिन्यांत त्यांनी ७० चर खोदले आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. ते एक ऑक्सिजन पार्कही उभारत आहेत. यामुळे पक्षी आणि वन्यजीव परत येत आहेत.”

कोण आहेत रमेश खरमाळे?

रमेश खरमाळे हे एक सेवानिवृत्त सैनिक असून त्यांनी सुमारे १७ वर्षे भारतीय सैन्यात देशसेवा केली आहे. २०१२ मध्ये निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली. मात्र ही नोकरी त्यांच्या मनासारखी नव्हती. देशसेवेची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तळमळ त्यांच्या मनात सतत होत होती.

त्यामुळे त्यांनी तरुणांसाठी सैनिकी प्रशिक्षण अकादमी सुरू केली. या अकादमी मार्फत अनेक तरुणांना त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी मदत केली. परंतु, त्यांना आपली खरी ओढ निसर्ग, पर्यावरण आणि सामाजिक सेवेच्या दिशेने असल्याची जाणीव झाली. त्यांनी वन विभागाची परीक्षा दिली आणि वनरक्षक म्हणून आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली.

निसर्गसेवेचा संकल्प

रमेश यांनी २०२१ मध्ये एक खास संकल्प केला, ‘निसर्गाला काहीतरी परत देण्याचा!’ ते म्हणतात, “आपण निसर्गाकडून खूप काही घेतलं आहे, पण परत दिलं आहे का?”

या विचारातूनच त्यांनी धामणखेल टेकडीवर जलसंधारणाचे कार्य सुरू केले. अवघ्या दोन महिन्यांत रमेश आणि त्यांच्या पत्नी स्वाती यांनी मिळून दोन महिन्यात तब्बल ३०० तासांचे श्रमदान करत ७० जलशोषक चर खोदले. यांची एकूण लांबी ४१२ मीटर होती. यामुळे एका पावसाळ्यातच ८ लाख लिटरहून अधिक पाणी जमिनीत मुरले आणि परिसरातील पाण्याची पातळी लक्षणीय सुधारली.

जैवविविधतेचे संवर्धन आणि ऑक्सिजन पार्क

या कामानंतर रमेश यांचे पुढचे लक्ष्य होते जैवविविधतेचे संवर्धन. त्यांनी धामणखेल टेकडीवर सुमारे ४५० देशी प्रजातींची झाडे लावली आणि ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्यास सुरुवात केली. पक्षी, प्राणी आणि वनस्पतींसाठी सुरक्षित निवासस्थान मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते.

उन्हाळ्याच्या तीव्र तापमानातही रमेश आणि त्यांचे कुटुंब झाडांना पाणी घालत होते. झाडांची निगा राखत होते. जखमी प्राणी-पक्ष्यांची देखभाल, तसेच जंगलात लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी विशेष उपाययोजना त्यांनी राबवल्या. स्थानिक लोकांनाही त्यांनी यात सामावून घेतले आणि जनजागृती केली.

कुटुंबाची साथ आणि जनतेचा सहभाग

रमेश यांची पत्नी स्वाती खरमाळे आणि त्यांची मुले देखील दर शनिवार - रविवारी त्यांच्यासोबत निसर्ग संवर्धनाचे काम करतात. हे संपूर्ण कुटुंब निसर्गसेवेचे आदर्श उदाहरण बनले आहे. रमेश म्हणतात, "मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा आणि त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आणण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे."

रमेश यांचा दृष्टिकोन केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नव्हता, तर 'शाश्वत पर्यावरण संवर्धन' हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते. त्यांनी जंगलात लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी विशेष व्यवस्था केली आणि स्थानिक लोकांनाही यासाठी प्रेरित केले.

रमेश यांनी सोशल मीडियावर रोपांची मदत मागितली आणि १०० हून अधिक रोपे लोकांनी त्यांना दान केली. ही केवळ स्थानिक पातळीवरची कृती नव्हे, तर ही जनसहभागातून घडवलेली निसर्गक्रांती आहे.

logo
marathi.freepressjournal.in