
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शनिवारी (दि. १३) अधिकृतरीत्या राजीनामा जाहीर करत मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. गेल्या काही दिवसांपासून महाजन यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपला निर्णय स्पष्ट केला.
त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले, ''नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझा राजकीय परिचय आपणास दिलाच पाहिजे असं नाही. आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठीच आलो आहे, की कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस असं वाटलं की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल.''
माझा वापर केला, माझ्या वाट्याला उपेक्षा आली...
महाजन यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्याला वापरण्यात आल्याची खंतही व्यक्त केली. त्यांनी सांगितले, ''व्यक्तिगत म्हणाल तर माझ्या अपेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीच्या तिकीटाची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु, कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर दिली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून जा चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. जे पाप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्रायश्चित मला देण्यात आले.''
मी अमितजींचा थोडा अपराधी - महाजन
अमित ठाकरे यांच्या बद्दल भावना व्यक्त करत महाजन म्हणाले, ''खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे. मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता, अमितजी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेल. पण, दुर्दैवाने परिस्थिती अशी आली, मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते प्रमाण त्याला मिळत नाही. हा नशिबाचा एक मी भाग समजलो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वर्थाने धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता इथं आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही पक्षाने दिलेल्या वागणुकीतून उपेक्षा झाल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हंटले आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच महाजनांनी पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढे प्रकाश महाजन कोणता राजकीय मार्ग निवडतात, पक्ष त्यांची मनधरणी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.